चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सहप्रवाशाचा मृत्यू

0
245

चालकही गंभीर जखमी
हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – दुचाकीवरून जाताना चालकाने बेजबाबदारपणे दुचाकी चालवली. वेगात दुचाकी चालविल्याने दुचाकीचा अपघात झाला आणि दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा तरुण देखील गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १८) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावर सुसखिंड येथे घडला.

अभिषेक नवनाथ कदम (वय २३, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. तर चालक शुभम संजय कांबळे (वय २३, रा. कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी महादू टकले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कांबळे आणि त्याचा मित्र अभिषेक कदम रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावरून जात होते. शुभम हा दुचाकी चालवत होता. तर अभिषेक हा पाठीमागे बसला होता. शुभमने दुचाकी बेदरकारपणे अतिवेगात चालवली. त्यामुळे सुसखिंड येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकींचा अपघात झाला. यात अभिषेकचा मृत्यू झाला असून शुभम हा गंभीर जखमी झाला आहे. शुभमवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.