चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरची चार दुकानांना धडक

0
477

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरने चार दुकानांना धडक दिली. त्यात चार दुकाने, चार वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात चौघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.

अजित विठ्ठल तांबे (वय ३०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक बसवराज बसप्पा (रा. बो-हाडेवस्ती, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कार ऍक्सेसरीजचे दुकान आहे. सचिन गोरडे त्यांची एसयूव्ही कार (एमएच १४/एच के ७७७५) साउंड फिटिंगसाठी सोमवारी दुपारी फिर्यादी यांच्या दुकानात घेऊन आले. फिर्यादी हे गोरडे यांच्या कारमध्ये साउंड फिटिंग करत होते. त्यावेळी गोरडे कारमध्येच बसले होते. अचानक मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु झाला आणि काही समजण्यापूर्वीच आरएमसी मटेरियल भरलेल्या हायवा डंपरने (एमएच १४/केए ७०४१) गोरडे यांच्या कारला धडक दिली. कार फिर्यादी यांच्या दुकानात घुसली. डंपर फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या लकी ब्रोक्स अँड लायनिंग वर्क्स, द डेली बेकर आणि योगेंद्र चव्हाण फोटोग्राफी या तीन दुकानात घुसला. फिर्यादी, सचिन गोरडे, द डेली बेकर दुकानातील कामगार तरुणी आणि डंपर चालक या घटनेत जखमी झाले. डंपरने गोरडे यांच्या कारसह आणखी एक कार आणि दोन दुचाकी वाहनांना धडक देऊन त्यांचेही नुकसान केले. या घटनेत चार दुकानांचे नुकसान झाले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.