चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून थकबाकी असणारे मालमत्ताधारक रडारवर; थकबाकीदारांची नावे प्रसिध्द करणार

0
256

पिंपरी, दि.६ (पीसीबी)- महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही मालमत्ता कर थकबाकी न भरणाऱ्यांच्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मुळ कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे पुढील आठवड्यापासून वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रसिद्ध केली जाणार आहेत. कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, या थकबाकीदारांमध्ये केवळ निवासी मालमत्ताधारक नव्हे तर विविध कंपनी, संस्था, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. चार वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या मालमत्तांची संख्या १ लाख १८६ असून त्यांच्याकडे एकूण ३०५ कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. कर संकलन विभागाने वारंवार नोटीस देऊनही कर भरत नसलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात प्रथम प्रामुख्याने ज्यांच्याकडे चार वर्षांपासून मुळ मालमत्ता कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यातही सर्वात प्रथम बिगर निवासी मालमत्ताधारक म्हणजेच औद्योगिक, व्यावसायिक आदी प्रकारच्या मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मालमत्ताधारकांची यादी तयार करण्याचेही कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाच्या आकडेवारीनुसार मागील चार वर्षात मालमत्ता कर न भरल्यामुळे एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या १ लाख १८६ एवढी आहे. यासर्वांकडे मिळून एकूण ३०५ कोटी ६९ लाख ७५ हजार २८४ रुपये थकबाकी आहे. यामध्ये निवासी मालमत्तांची संख्या ८४ हजार ५५७ असून त्यांच्याकडील थकबाकी १६८ कोटी ४८ लाख ८ हजार १४३ रुपये, बिगर निवासी मालमत्तांची संख्या १२ हजार ९७३ असून त्यांच्याकडील थकबाकी ८७ कोटी ७८ हजार ४२७ रुपये, औद्योगिक मालमत्तांची संख्या ३९२ असून त्यांच्याकडील थकबाकी १० कोटी ५७ लाख ६७ हजार ३३९ रुपये, तर मोकळ्या भूखंडाची संख्या २ हजार २२२ असून त्यांच्याकडील मालमत्ता कर थकबाकी ३९ कोटी ५४ लाख १६ हजार ८२९ एवढी आहे. यासर्वांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे नियोजन कर आकारणी व कर संकलन विभागाने केल्याने वारंवार मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

८४ हजार ५५७ निवासी मालमत्ताधारकांकडे १६८ कोटी ४८ लाख ८ हजार १४३, बिगर निवासी १२ हजार ९७३ मालमत्ताधारकांकडे ८७ कोटी ७८ हजार ४२७, औद्योगिक ३९२ मालमत्ताधारकांकडे १० कोटी ५७ लाख ६७ हजार ३३९, मोकळा भूखंड – २ हजार २२२ – ३९ कोटी ५४ लाख १६ हजार ८२९ कोटी कर थकला आहे.