चार लाख घरे कुठून देणार : नाना काटे यांची अर्थसंकल्पावर टीका

0
281

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणार आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या पदरी निराशा देणारा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना काटे यांनी अर्थसंकल्पावरती टीका केली आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा खेळ करून नव्याने अर्थसंकल्प मांडला आहे. तर काही जुन्या कामांना नवीन नावे देऊन जनतेसमोर आश्वासनांची खैरात केली आहे. तसेच 2017 नंतर पिंपरी चिंचवड शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकाही लाभार्थ्याला घराचा ताबा मिळाला नाही. मात्र राज्य सरकारकडून ४ लाख घरांची घोषणा करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. या अर्थसंकल्पात कोणतेही भरीव तरतूद दिसून येत नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेच्या भावनांशी खेळ करणारा अर्थसंकल्प मांडला आहे.

तसेच दिल्ली आणि पंजाब मधील सरकारच्या योजना चोरी करून त्याच धर्तीवर “आपला दवाखाना” नावाने योजना राज्यात सुरू केली तर महिलांना प्रवाशांमध्ये 50% सूट देण्याची घोषणा करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर आजच्या महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा अमलात आणणे गरजेचे होते. आमचे नेते तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या पंचसूत्री अर्थसंकल्पाची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दखल घेतली होती. मात्र, राज्य सरकारच्या अर्थमंत्री फडणवीस यांनी पंचसूत्रीमध्ये त्रुटी दाखवत राजकीय द्वेष दाखवला. राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यापेक्षा विरोधकांच्या निर्णयांमध्ये त्रुटी दाखवतअसल्याचे या अर्थसंकल्पात दिसून येते असं नाना काटे यांनी म्हटले आहे.