चार महिन्यांत आठव्या चित्त्याचा मृत्यू…! मृत्युचे कारण…

0
527

देश,दि.१५(पीसीबी) – मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सूरज नावाच्या नर चित्त्याचा १४ जुलै २०२३ मृत्यू झाला. या चित्याच्या मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डॉक्टर त्याच्या मृत्युचा तपास करीत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या चार महिन्यात उद्यानातील चित्ताचा हा आठवा मृत्यू आहे. यामध्ये ५ प्रौढ आणि तीन शावकांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नर चित्ता सूरजला २५ जून रोजी मोठ्या जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, आज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तो जंगलात मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. मृत नर चित्ता सूरजचे शवविच्छेदन करण्यात येत असून त्यानंतरच त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या मृत्यूची घटना सुरूच आहे.

या अभयारण्यात आतापर्यंत एकूण ५ प्रौढ आणि ३ चित्तांचा मृत्यू झाला. अद्याप त्यांच्या मृत्युचे कारण समजू शकलेले नाही. अधिकारी देखील त्यांच्या मृत्युची माहिती सांगण्यास नकार देत आहेत. प्रत्येक वेळी व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप होतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नुकतेच कुनो अभयारण्यात मंगळवारी तेजस नावाच्या नर चित्ताचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या मादा चित्त्यासोबत झालेल्या भांडणात त्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले.