चार-पाच पक्ष बदलणाऱ्या अध्यक्षांकडून अपेक्षा ठेवणे गैर

0
187

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत. या विषयावर ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याने आमदार अपात्रता प्रकरणी या निर्णयाच्या आधारे सर्व याचिका फेटाळल्या जाण्याची चिन्हे आहेत. याआधी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात दोन्ही बाजूपैकी एकाही आमदाराला अपात्र ठरविण्यात आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत कोणता निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना उल्हास बापट म्हणाले की, आपली संसदीय लोकशाही ब्रिटनवरून घेण्यात आली आहे. तिथे सभागृहाचा अध्यक्ष पंचप्रमाणे काम करतो. तिथे सभागृहाचा अध्यक्ष निवडला गेल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देऊन पुढे काम पाहतो. आपल्याकडचा अध्यक्ष कुठल्यातरी पक्षाचा सदस्य असतो, त्यामुळे त्याच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यात जर चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर त्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे.

“पक्ष कोणाचा आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हे आता आपल्या सर्वांनाच कळले आहे. पण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान करतात. ६५ वर्षांनंतर त्यांना योग्य कामाची बक्षिसी देण्याचे कामही पंतप्रधान करतात, त्यामुळे मी त्यांच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करत नाही. राहता राहिला प्रश्न राज्यपालांचा, तर त्यांचीही निवड पंतप्रधानांच्या सूचनेवर राष्ट्रपती करत असतात. ज्या पदावरील लोकांनी तटस्थपणे पंचाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, त्यांची विश्वासाहर्ता घसरताना गेल्या काही काळापासून आपल्याला दिसत आहे”, असे महत्त्वाचे विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका सादर केली होती. विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिलेली मुदत आज (दि. १५ फेब्रुवारी) संपत असून संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत.