चारित्र्याच्या संशयावरुन खून

0
292

पुणे दि. ९ (पीसीबी) -थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले. खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी तपास करुन तरुणीच्या प्रियकरास अटक केली. चारित्र्याच्या संशयावरुन त्याने प्रेयसीचा खून केल्याचे तपास उघडकीस आले आहे. वैशाली लाडप्पा दुधवाले (सध्या रा. भीमा कोरेगाव, मूळ चिवरी,ता. उमरगा, जि.उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी प्रियकर महेश पंडीत चौगुले (वय २४ सध्या,रा. तळेगाव दाभाडे, मूळ चिवरी,ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली. चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. वैशाली केअरटेकर म्हणून काम करत होती. दोघे एकाच गावातील आहेत. त्यामुळे त्यांची ओळख होती. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ५ जुलै रोजी थेऊरमधील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील मोकळ्या जागेत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता.

तरुणीची ओळख पटली नव्हती. तांत्रिक तपासात तरुणीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी वैशालीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. वैशालीच्या आईची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपी महेश चौगुले याच्याशी वैशालीचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौगुलेचा माग काढण्यास सुरुवात केली. चौगुलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वैशालीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे परिसरात त्याला पकडण्यात आले. चारित्र्याच्या संशयातून त्याने वैशालीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे, राजेश दराडे, गणेश भापकर, निखिल पवार, मल्हारी ढमढेरे आदींनी ही कारवाई केली.