चायनीज आरोपींसोबत संगनमत करून सायबर फसवणूक करणारा चित्रपट निर्माता अटकेत

0
14

86 लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी चायनीज गुन्हेगाराशी कनेक्शन उघड

दि. २८ ( पीसीबी ) – चायनीज नागरिकाच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात 86 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, आणखी अनेक तक्रारींचा तपास सुरु आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (रा. एरंडवणे, पुणे) असे असून, तो स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचे सांगतो. परंतु तपासादरम्यान त्याने चायनीज नागरिक बाम्बिनी (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याशी संपर्कात राहून बँक खात्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी यांनी युट्युबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सअ‍ॅप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या अ‍ॅबॉट वेल्थ नावाच्या अ‍ॅपवर नोंदणी केली होती. सुरुवातीला ५०० रुपयांची गुंतवणूक करून त्यांना काही दिवसांत ५ कोटी १५ लाखांचे प्रॉफिट असल्याचे दाखवण्यात आले. पण पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी होऊ लागली. त्यावरून संशय बळावल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात 57,70,670 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान आरोपीने वापरलेले आईडीएफसी बँकेतील खाते हे “बालाजी इंटरप्रायझेस” या नावाने सुरू करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण आणि त्यांच्या पथकाने डेक्कन पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. सुरुवातीला तो “मी चित्रपट निर्माता आहे, अशा गोष्टी कशा करीन?” असे उत्तर देत होता. मात्र सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल तपासात त्याने चायनीज आरोपींच्या सांगण्यानुसार खाते उघडले व फसवणुकीसाठी वापरल्याचे कबूल केले.

तपासात उघड झाले की आरोपीच्या खात्यावर एकूण 86 लाख 43 हजार 111 रुपये जमा झाले होते आणि त्या खात्यावर 15 पेक्षा जास्त फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये आणखी दोन बँक खाती फसवणुकीसाठी तयार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. वेळीच अटक केल्यामुळे इतर अनेक लोकांची फसवणूक टळली, असे पोलीसांनी सांगितले. आरोपीकडून 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून बँक खात्याची माहिती तपासणीसाठी घेतली आहे. तसेच चायनीज नागरिक बाम्बिनी आणि इतर सहआरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोसले, विनायक म्हसकर, सुरज शिंदे, सोपान बोधवड, दीपाली चव्हाण, वैशाली बर्गे, भाविका प्रधान यांनी केली आहे.