दि . २५ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या माध्यमातून चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर स्मारकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. या स्मारकासाठी महापालिकेने ‘क्रांतिवीर चापेकर भारतीय वारसा दर्शन संस्थान’ या नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यांचा निर्णय घेतला आहे. तसेच, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांचे संचालक मंडळही निश्चित करण्यास स्थायी सभेत मान्यता देण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये क्रांतीवीर चापेकर बंधूंचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे. नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातून प्रेरणा मिळावी. च्यात देशप्रेमाची जागृती वाढवावी. भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा. या उद्देशाने क्रांतिवीर चापेकर बंधू संग्रहालयाची निर्मिती चापेकर वाडा येथे केली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर स्मारकाच्या व्यवस्थापनाबाबत स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासक शेखर सिंह यांनी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणे व त्यासाठी गिरीश परळीकर यांची कंपनी सचिव म्हणून नेमणूक करण्यास स्थायी समिती व महापालिका सभेची मान्यता दिली. तसेच, चापेकर वाडा येथील संग्रहालयाचे दैनंदिन कामकाज, आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे, वेबसाईट तयार करणे, ऑनलाइन तिकीट बुकिंग व पेमेंटची व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रस्तावासोबत ‘क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय’ प्रवेशशुल्क निश्चित करण्यात आले. त्यानुसार दर प्रती व्यक्ती वयोमर्यादा ३ वर्षांपर्यंत मोफत, ३ ते १८ वर्षे रक्कम ५० रुपये, १८ वर्षे ते पुढील वयोगटासाठी रक्कम १०० रुपये दर असतील. तसेच शाळा व महाविद्यालय यांच्यासाठी प्रवेश शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्रपणे संचलित प्रकल्पांमध्ये आणखी एका प्रकल्पांची भर पडली आहे. यापूर्वी ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, स्मार्ट सिटी, संतपीठ, दिव्यांग भवन इ. प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे.
असे असेल संचालक मंडळ
या कंपनीचे व्यवस्थापनासाठी १२ जणांचे संचालक मंडळ निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्त असतील. यासह विद्यमान महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता हे संचालक असणार आहे. हे पदाधिकारी नसल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, कायदा सल्लगार राजेश आगळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने सुचवलेले ३ प्रतिनिधी – पद्मश्री गिरीष प्रभुणे, मिलिंदराव देशपांडे, सतीश गोरडे यांची संचालक म्हणून नेमणूक केली आहे.