पिंपरी, दि.२ (पीसीबी) -चाकूचा धाक दाखवून तरुणाची सोनसाखळी काढली. त्यानंतर नागरिकांना चाकू उगारून त्यांना मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी रामनगर, चिंचवड येथे घडली.
अजितकुमार रवींद्र साह (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाथ कुसाळकर (वय 34, रा. रामनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराशेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादींच्या पोटाला चाकू लावला आणि गळ्यातील 25 हजार 500 रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी जमलेले लोक आरोपीला विरोध करीत होते. आरोपीने नागरिकांना चाकू दाखवून मध्ये आलात तर ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












































