चाकूच्या धाकाने मोबाईल पळवणाऱ्यास नागरिकांनी पकडले

0
221

पिंपरी, दि ४ (पीसीबी)- चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल फोन चोरून नेणाऱ्या एकास नागरिकांनी पकडले. ही घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजता निघोजे येथे घडली.

गुलाब अब्दुल गफार (वय 25, रा. गणेशनगर, तळवडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ललित दिलीप सोनवणे (वय 22, रा. निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे महिंद्रा सर्कल ते निघोजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना त्यांना एका दुचाकीस्वाराने अडवले. अर्जंट फोन करण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादींना फोन मागितला. फिर्यादींनी फोन न दिल्याने दुचाकीस्वाराने चाकूचा धाक दाखवून फिर्यादी यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. मोबाईल चोरून जात असताना फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जवळच असलेले दोघेजण फिर्यादी यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.