मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई
चाकण, दि. ८ (प्रतिनिधी)
संशयीत वाहनांची तपासणी करताना पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने १० लाखांची रोकड जप्त केली. चाकण येथे नाशिक महामार्गावर गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महाराजा हॉटेलच्या बाजूला ही कारवाई केली.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ‘सरप्राईज चेकिंग’ केले असता प्रशांत तुकाराम गाडे, शिवाजी कांताराम गव्हाणे (दोघे रा. चाकण) यांच्याकडे १० लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रोकड जवळ बाळगण्याबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर पंचनामा करून रोकड ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच निवडणूक अधिकारी यांना देखील कळविण्यात आले.