चाकण मध्ये महिलेवर चाकूने वार : एकास अटक

0
238

चाकण, दि. १० (पीसीबी) – एका तरुणाने महिलेच्या घरात जाऊन तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. महिलेने नकार दिला असता आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजता एकतानगर चाकण येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जालिंदर दिगंबर मधे (वय 23, रा .ओझर, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एकट्याच घरी असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. ‘तू माझा फोन का उचलत नाहीस. माझ्या बरोबर चल’ असे आरोपी फिर्यादी यांना म्हणाला. त्याच्यासोबत जाण्यासाठी फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत किचन ओट्यावरील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या हातावर वार करून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.