चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र आल्या आहेत. चाकणमध्ये शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनिषा गोरे यांनी रविवारी (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे (उबाठा) स्थानिक आमदार बाबाजी काळे व शिवसेनेचे (शिंदे) आमदार शरद सोनावणे उपस्थित होते. तसेच यावेळी दोन्ही शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान बाबाजी काळे म्हणाले, “खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पश्चात ही येथील पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे मनिषा गोरे यांच्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवलं आहे. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून आम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनिषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, याला आमची युती म्हणता येणार नाही”, काळे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली.
शिवसेनेचा (उबाठा) एकनाथ शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा
आमदार बाबाजी काळे म्हणाले, “आमच्या या कृतीला युती म्हणता येणार नाही. २०१४ साली सुरेश गोरे हे शिवसेनेचे आमदार होते. मात्र, करोना काळात त्यांचं निधन झालं. मूळ शिवसेना (उबाठा) या पक्षाचा मी २०२४ पासून आमदार आहे. मी २०२४ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा आमच्या व्यासपीठावर मनिषा गोरे यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंब उपस्थित होतं. त्यांनी माझा जाहीर प्रचार केला होता. आता मनिषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून आपण मनिषा गोरे यांना पाठिंबा द्यावा, त्यांना बिनविरोध निवडून आणावं असं आम्ही ठरवलं.”













































