आळंदी, दि. ३१ ( पीसीबी ) – ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई मंत्रालय येथील दालनामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी व चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे विषय मांडले. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी तळेगाव -चाकण -शिक्रापूर या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून काम देखील काही दिवसानंतर सुरू होईल, परंतु आता या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत. साईट पट्ट्या वर खडीकरण मजबुतीकरण करण्यात यावे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० नाशिक फाटा, राजगुरुनगर या रस्त्याचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे, या रस्त्याचे काम हाती घेत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात जात आहेत, त्यांच्या भूसंपादना चा प्रश्नही प्राधान्याने सोडवण्यात यावा. चाकण औद्योगिक क्षेत्रातील जीव घेण्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत . याचा गांभीर्याने विचार करत वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, परिसरातील रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत. यासाठी प्राधान्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आंबेठाण चौक ते तळेगाव चौक या रस्त्यातील विद्युत पोल काढणे, ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे. त्या ठिकाणी दुरुस्त करणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आमदार बाबाजी काळे यांनी या बैठकीत संवाद साधत मांडल्या. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून तात्काळ निर्देश देण्यात आले. तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर हा रस्ता नॅशनल हायवे अथोरिटी करणार आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवणे ,साईट पट्ट्या भरणे यासाठी एमआयडीसी भागाकडून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीला आमदार बाबाजी काळे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, आमदार सचिन आहिर, माजी आमदार बाळा भेगडे, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्याधिकारी चाकण / तळेगांव नगरपालिका, अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.