चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची ग्वाही

0
263

पुणे, दि. १६ (पीसीबी) – चाकण एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणाचे कामे वेगाने सुरू आहेत. उद्योगांचे वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून ग्राहकसेवेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींसमवेत सातत्याने संवाद साधून विविध प्रश्न निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

चाकण एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. १६) महावितरण व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र एडके, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल, पदाधिकारी श्री. विनोद जैन, श्री. अनिल बजाज तसेच औद्योगिक ग्राहकांच्या ६५ प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘एसएसएमआर’ योजना व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून २ नवीन स्विचिंग स्टेशन, १४२ रिंगमेन युनिट, २८ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या कामांना सुरवात झाली आहे. यामध्ये तीन नवीन स्विचिंग स्टेशन्स, एका स्विचिंग स्टेशनची क्षमतावाढ, ३५ किलोमीटर नवीन भूमिगत वाहिन्या, ज्या वीजवाहिन्या अतिभारित आहे त्यांचे विभाजन करून नवीन वीजवाहिन्या टाकणे, सहा नवीन रिंग मेन युनिट आदींचे कामे सुरु आहेत.

या बैठकीमध्ये विविध उद्योगांचे संचालक व प्रतिनिधींनी वीजविषयक स्थानिक प्रश्न व अपेक्षांची माहिती दिली. त्यानुसार श्री. पवार यांनी संबंधीत वीज प्रश्नांचे ताबडतोब निवारण करण्यासाठी स्थानिक अभियंत्यांना सूचना देत तांत्रिक उपाययोजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे, सहायक अभियंता श्री. रामप्रसाद नरवाडे तसेच चेतन पाटील, अनिल भोसले, अभिजित देव, संतोष हांडे, लोकेश जैन आदींसह विविध कंपन्यांचे ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते.