चाकण आणि देहूरोड मधून चार पिस्टल जप्त

0
274

चाकण, दि. १२ (पीसीबी) – चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवायांमध्ये पोलिसांनी चार पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) गुन्ह्यांची नोंद करत दोघांना अटक केली आहे.

गौरव बंशी टोपे (वय २३, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) याला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलीस शिपाई विनोद वीर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर रोहकल गाव फाट्यावर एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा ८२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

आसिफ इस्लामुद्दीन शेख (वय ३७, रा. देहूरोड) याला साईनगर देहूरोड येथून अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखलीचे सहाय्यक निरीक्षक राकेश गुमाणे यांना माहिती मिळाली की, साईनगर येथे एकजण पिस्टल घेऊन आला आहे. त्यानुसार सापळा लावून कारवाई करत आरोपी आसिफ याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन काडतुसे असा २० हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.