चाकणच्या वाहतूक कोंडीवरुन संतप्त ग्रामस्थांचा एल्गार!

0
53

दि.०९(पीसीबी)- पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि सार्वजनिक सुविधा नसल्याच्या मुद्द्यावरून अखेर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यालयावर मोर्चा काढला.

मोर्चा पूर्णतः शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पीएमआरडीए कार्यालयाच्या गेटपर्यंत पोहोचला. मात्र, कार्यालयाच्या आत प्रवेश नाकारल्याने खासदार अमोल कोल्हे आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. “आम्ही शांततेत मोर्चा आणला आहे, कुठल्या नियमाखाली आम्हाला अडवता?” असा सवाल कोल्हेंनी केला. “आम्हाला आत जा, नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांना खाली बोलवा,” असा तीव्र सूरही त्यांनी लावला. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यानंतर प्रशासनाने लवचिकता दाखवत खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळाला पीएमआरडीए कार्यालयात प्रवेश दिला. शिष्टमंडळाने वाहतूक नियोजन, रस्त्यांची कामं, सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवणं, तसेच स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा सुधारण्याच्या मागण्या प्रशासनाकडे लेखी स्वरूपात मांडल्या.

या मोर्चामागील प्रमुख कारण म्हणजे चाकण परिसरातील नागरी समस्या आणि शासनाच्या ढिसाळ नियोजनाविरुद्ध लोकांमध्ये वाढलेला रोष. आजचा मोर्चा फक्त निषेध नव्हता, तर शासनाला जागं करण्याचा एक ताकदवान इशारा होता. आता प्रशासन या मागण्यांवर कितपत गांभीर्याने पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.