पिंपरी,दि. २५ (पीसीबी) – “एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या समान असते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे रविवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘कथा पुस्तक जन्माची’ या विषयावरील व्याख्यानातून केले. भारतीय स्त्री शक्ती जागरण, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित वाचकमंच मेळाव्यात प्रकाशन क्षेत्रातील आपले रंजक अनुभव कथन करताना नितीन हिरवे बोलत होते. साहित्यिक अनिल आठलेकर, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, गणेश आढाव आणि वाचकमंच प्रमुख वासंती कुलकर्णी यांच्यासह वाचकमंच महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नितीन हिरवे यांनी यावेळी
लालबागच्या कामगार वस्तीत आणि आर्थिकदृष्ट्या अभावग्रस्त अवस्थेत बालपण व्यतीत करीत असतानाही केवळ जिद्द, कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या शिदोरीवर प्रकाशन क्षेत्रातील आपली यशस्वी वाटचाल खुसखुशीत शैलीतून मांडली. भारतरत्न लता मंगेशकर, ज्ञानपीठकार कुसुमाग्रज, कविवर्य शंकर वैद्य, सुधीर मोघे, प्रवीण दवणे अशा दिग्गजांच्या भेटी, त्यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन याविषयी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून हिरवे पुढे म्हणाले की, “नवोदित लेखक, कवींनी आपल्या लेखनाकडे तटस्थपणे पाहावे. टीकाटिप्पणीचे स्वागत करावे. विविध नियतकालिकांमधून आपल्या लेखनाला रसिकांना दाद दिल्यानंतरच पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घ्यावा; तसेच प्रकाशकांनी साहित्य निवड करताना चोखंदळपणा दाखवून मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत पुस्तक सर्वांगसुंदर कसे होईल, याची दक्षता घ्यावी. आय एस बी एन क्रमांक, कॉपी राईट्स याविषयी लेखकाने जागृत राहावे. प्रकाशन सोहळा, ऑनलाईन माध्यमांचा वापर, नियतकालिकांमधून पुस्तक परीक्षण या गोष्टींमुळे पुस्तक जागतिक पातळीवरील वाचकांपर्यंत पोहचते. आपल्या घरात पुस्तकांचे कपाट असावे, नियतकालिकांचे नियमित वाचन करावे, व्यस्त दिनक्रम असला तरी निदान रेडिओच्या माध्यमातून जगाशी स्वतःला जोडून घ्यावे; कारण या गोष्टींमुळे जीवन सुसंस्कृत होते. घरातील मुलांना आपण जसा जीव लावतो; तसे प्रेम पुस्तकांवर केले तर जगणे सुखाचे होईल!”
दीपप्रज्वलन, सरस्वती आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. निकिता कछवा यांनी प्रास्ताविक केले. वासंती कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. वाचकमंच महिला सदस्यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत; तसेच भगवद्गीतेवर आधारित भारुडाचे सादरीकरण केले. रूपाली देव यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा कमलापूरकर यांनी आभार मानले.