पिंपरी, दि. १५ – बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईच्या नावाखाली कुदळवाडीवर देशातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली आणि टीपी स्किम आणल्याचा गावकऱ्यांचा आरोप प्रशासनाला जिव्हारी लागल्याने अखेर ग्रामस्थांच्या बाजुने निर्णय झाला. दुसरीकडे चऱ्होली गावात तब्बल १४२५ हेक्टर म्हणजे ३ हजार ५६२ एकर क्षेत्रावर पाच टीपी स्किमचा आराखडा कायम करण्याचा निर्णय महापालिका सभेत प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांनी केला आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत चऱ्होलीत टीपी स्किमसाठी एक इंचही जागा देणार नाही आणि ती भूमिका कायम असल्याचे गावकऱ्यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधीला सांगितले. आमदार महेश लांडगे यांनी देखील चऱ्होलीच्या भूमिपुत्रांसाठी लढणार आणि टीपी रद्द करून घेणार, अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली आहे.
आमदार महेश लांडेग म्हणाले ….
चऱ्होलीबाबत भूमिपुत्रांसाठी मी लढणार आहे. मौजे चिखलीतील प्रस्तावित TP Scheme प्रशासनाने रद्द केली. मात्र, अद्याप मौजे चऱ्होलीतील प्रस्तावित TP Scheme बाबत निर्णय झालेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ग्रामस्थ, भूमिपुत्र यांची बाजू ऐकूण घेणार आहेत. त्यासाठी आयुक्त- ग्रामस्थ यांची श्री वाघेश्वर महाराज मंदिरात लवकरच बैठक घेण्यात येईल. भूमिपुत्रांचा TP Scheme ला का विरोध आहे ? याबाबत सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवूनच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, चऱ्होलीची TP Scheme सुद्धा चिखली-कुदळवाडीप्रमाणे रद्द करावी, अशी आमची ठाम मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
चिखली-कुदळवाडीचा TP Scheme रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांचे आभार व्यक्त करतो. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. याच धर्तीवर आता चऱ्होलीची TP Scheme संदर्भातील प्रक्रियाही रद्द करावी. कारण, भूमिपुत्रांचा या स्कीमला विरोध आहे. संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) आगामी तीन महिन्यांत अंतिम होईल. त्यामुळे चऱ्होलीसाठी नवीन TP Scheme आवश्यकता नाही, अशी माझी भूमिका आहे. लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक, जागामालक, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे.