- डाक विभागाच्या विविध सेवांचा आता स्थानिकांना थेट लाभ
पिंपरी,- पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विस्तार होत असताना, चऱ्होली आणि परिसरानेही मोठी झेप घेतली आहे. औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या वाढत्या गरजांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होत असताना, भारतीय डाक विभागानेही चऱ्होलीच्या शहरीकरणावर अधिकृत ‘शिक्कामोर्तब’ केले आहे. चऱ्होली आणि परिसरासाठी स्वतंत्र शहरी पिन कोड (411081) प्रदान करण्यात आला असून, येथील शाखा डाकघराला ‘उपडाकघर’ म्हणून मान्यता मिळाली आहे.
1997 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या चऱ्होली गावाने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे. मात्र, ग्रामीण पिन कोड असल्यामुळे प्रशासनिक आणि व्यापारिक पातळीवर अनेक अडचणी येत होत्या. औद्योगिकीकरण, गृहनिर्माण प्रकल्प आणि व्यापारी वाढ यामुळे पोस्टल सेवांवर प्रचंड ताण येत होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या सोयीसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी चऱ्होलीला शहरी पिन कोड मिळावा, तसेच येथे स्वतंत्र उपडाकघर सुरू करावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
महिला दिनाच्या औचित्यावर नवीन चऱ्होली उपडाकघराचे लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माजी महापौर नितीन काळजे, पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, माजी नगरसेवक सुवर्णा बुरडे, सुनील काटे, गणेश सस्ते, योगेश तळेकर आणि इतर मान्यवरांची होती.
चऱ्होलीसह वडमुखवाडी, निरगुडी, डुडूळगाव, चोवीसावाडी आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांना या नव्या पिन कोडचा लाभ होणार आहे. यामुळे पोस्टल डिलिव्हरी वेगवान होईल, ऑनलाईन शॉपिंग आणि इतर सेवांमध्ये सुसूत्रता येईल, तसेच प्रशासनिक सोयींमध्ये सुधारणा होईल.
उपडाकघराच्या स्थापनेमुळे नागरिकांना पोस्टल सेवांचा अधिक चांगला लाभ मिळणार आहे. पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी सांगितले की, आता डाक विभागाच्या विविध बचत योजना, आधार अपडेट सेवा, विमा योजना, अपघाती विमा योजना आणि जलद पार्सल सेवा चऱ्होलीतच उपलब्ध होतील. यावेळी डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. महिला दिनाचे औचित्य साधत, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला विमा प्रतिनिधी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चऱ्होली परिसर आता नागरी सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. नव्या पिन कोडमुळे व्यवसाय, उद्योग, शिक्षण आणि नागरी सेवांचा दर्जा अधिक उंचावेल. आमदार महेश लांडगे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “चऱ्होलीचा झपाट्याने होणारा विकास आणि नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”