- टीपी रद्दच्या मागणी बरोबर प्रशासनाच्या विरोधात गगनभेदी घोषणा
पिंपरी, दि . १६ ( पीसीबी ) – कुदळवाडी ग्रामस्थांनी वज्रमूठ दाखवून जोरदार विरोध केला आणि महापालिका प्रशासनाचा टीपी स्किम योजनेचा डाव उधळून लावला मात्र, चऱ्होली परिसरातील पाचही टीपी स्किम कायम ठेवल्या. आपल्याबाबत प्रशासनाने दुजाभाव केल्याचे लक्षात आल्याने संतापलेल्या चऱ्होली ग्रामस्थांनी सकाळी गावात बैठक घेऊन थेट महापालिकेवर हल्ला बोल केला आणि जबरदस्त आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करत टीपी रद्द होत नाही तोवर यापेक्षा अधिक जोमाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी सर्व नेत्यांनी दिला. माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या नेतृत्वाखाली सगळी गावकी एकवटली आणि प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात तुटून पडल्याचे चित्र होते. भाजपचे आमदार महेश लांडगे यावेळी काहीवेळ आंदोलनस्थळी उपस्थित होते.
टीपी स्किम अर्थात नगररचना योजनेचे नियोजन करताना कुदळवाडीत ३८० हेक्टर आणि चऱ्होलीत १४२५ हेक्टर क्षेत्राचा इरादा घोषित केला होता. महापालिका सभेत आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबत निर्णय केला होता. कुदळवाडीच्या ग्रामस्थांनी आपल्या परिसरात तीन महिन्यांपूर्वी केलेली अतिक्रमण कारवाई ही बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हे तर टीपी स्किम साठी होती असा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला. प्रकरण अंगावर येणार असे दिसताच आमदार लांडगे यांनीही गावकऱ्यांच्या बाजुने असल्याचे घोषित केले आणि टीपीला विरोध केला. कुदळवाडीची योजना रद्द केल्याचे आदेश निघाले मात्र, चऱ्होली ची योजना मी राबविणारच असा निग्रह आयुक्तांनी केला. कुदळवाडीला एक न्याय आणि चऱ्होलीला दुसरा न्याय असा दुजाभाव केल्याने चऱ्होलीकर संतापले आणि त्यांनी आंदोलनाचा निर्णय केला.
आज सकाळी गावच्या विठ्ठल मंदिरात अगदी उत्फुर्तपणे हजारावर गावकरी जमले आणि टीपी स्किम विरोधात सगळ्यांनी बाह्या सरसावल्या. गर्दीचा पवित्रा लक्षात आल्यावर खुद्द आमदार महेश लांडगे हेसुध्दा त्या ठिकाणी आले आणि टीपी रद्द साठी मी स्वतः प्रयत्न करत असल्याचे सांगून शांततेचे आवाहन केले. आमदार लांडगे यांनी तिथूनच आयुक्त शेखर सिंह यांना मोबाईलवर संपर्क केला होता पण ते प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने संवाद झाला नाही. दरम्यान, ही बैठक संतपाच महापालिकेवर मोर्चा काढायचे ठरले आणि तडक सगळे पिंपरीच्या दिशेने निघाले.
दुपारी दीडच्या सुमारास महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड निदर्शने सुरू झाली आणि वातावऱण तणावपूर्ण झाले. माजी महापौर काळजे यांच्या नेतृत्वाखाली सगळे गावकरी अत्यंत वेगळ्या भुमिकेत होते. टीपी रद्द करा…, आयुक्तांची बदली करा…, जमीन आमच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची… अशा घोषणांनी आसमंत दुमदूमला होता.
निदर्शने संपल्यावर बाळासाहेब तापकीर, कुणाल तापकिर –
शैला मोळक आदींची भाषणे झाली. येत्या सोमवारी पुन्हा सर्वांनी महापालिका भवनासमोर जमायचे आणि आयुक्तांना निवेदन द्यायचे ठरले.