पुणे, दि. २३ (पीसीबी) – बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्री धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे एका षड्यंत्राद्वारे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त पंडित धीरेंद्र शास्त्रीच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदु धर्मातील साधुसंत यांना बदनाम करण्याचे फार मोठे षड्यंत्र राष्ट्रीय स्तरावर राबवले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव, साम्यवादी आणि काँग्रेसचे काही लोक हिंदु धर्माचे कार्य बंद कसे होईल यासाठी सुनियोजितपणे हे षड्यंत्र राबवत आहेत; मात्र हेच लोक खुलेआम चमत्कारांच्या नावे फसवणूक करून हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी किंवा पाद्री यांना कधीही आव्हान देताना दिसत नाहीत. त्यामुळे हिंदु धर्माला अपकीर्त करणार्यांना रोखण्यासाठी केंद्रशासनाने कठोर कायदा करावा, अशी मागणी नाशिक येथील ‘श्रीकाळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बागेश्वर धाम (पंडित धीरेंद्र शास्त्री) यांना का लक्ष्य केले जात आहे ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
घरवापसी कार्यक्रम केल्यापासून अंनिसवाल्यांचा पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विरोध ! – श्री. रमेश शिंदे
पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ख्रिस्ती मिशनर्यांनी बाटवलेल्या हिंदूंची घरवापसी करण्यास प्रारंभ केल्यापासून ‘अंनिस’ने पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्याला विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी कुणाची फसवणूक किंवा कुणाचे शोषण केले आहे का ? श्रद्धा कि अंधश्रद्धा हे सूत्र प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. कोणत्याही विद्यापीठाची अधिकृत पदवी नसतांनाही स्वत:ला संमोहन उपचारतज्ञ म्हणवून घेणारे ‘अंनिस’चे शाम मानव लोकांची फसवणूक करत नाहीत का ?, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.
‘सुदर्शन न्यूज’च्या नागपूर येथील पत्रकार सौ. स्नेहल जोशी म्हणाल्या की, ‘पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपूर येथील कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार या नात्याने उपस्थित होते. या वेळी पंडित धीरेंद्र शास्त्रीजी यांनी नागपूर येथील कार्यक्रम 5 ते 11 जानेवारीपर्यंत असणार, असे घोषित केले होते आणि बागेश्वर धाम व्यवस्थापनाने 3 जानेवारी या दिवशी ट्विवट करून याच तारखांची घोषणा केली होती; मात्र काही त्रुटींमुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा नागपूर येथील कार्यक्रम 5 ते 13 जानेवारीपर्यंत असणार असे घोषित झाले होते. समन्वयाच्या अभावामुळे तारखांमध्ये घोळ झाल्याचा अपलाभ उठवून अंनिसवाल्यानी धीरेंद्र शास्त्री आव्हान न स्वीकारता पळून गेले म्हणून प्रचार करून त्यांना बदनाम केले.