लखोबा लोखंडे हे प्रल्हाद केशव अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच!’ नाटकातील प्रसिद्ध पात्र. एक माणूस वेशांतर करुन आणि विविध महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची कशी फसवणूक करतो यावर भाष्य करणारं हे नाटक होतं. या नाटकाची आठवण होण्याचं कारण असाच एक आधुनिक लखोबा. या महाभागाने सात राज्यांमधल्या १५ महिलांशी लग्न केलं आणि त्यांना ब्लॅकमेल करत होता, पैसे लुबाडत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे हे प्रकरण?
बिरांची नारायणनाथ असं या आधुनिक लखोबाचं नाव आहे. हा ओदिशा येथील अंगुल जिल्ह्याचा रहिवासी आहे. बिरांची नारायणनाथ मॅट्रीमोनियल वेबसाईटवरचा वापर करुन लग्नासाठी इच्छुक असलेल्या महिलांचा शोध घेत असे. तो स्वतःची ओळख रेल्वेमधला अधिकारी, कस्टममधला अधिकारी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधला अधिकारी अशी करुन द्यायचा. त्याने स्वतःची खोटी प्रोफाईलही या लग्न जुळवून देणाऱ्या संकेत स्थळांवर तयार केली होती. बिरांची मध्यम वयाच्या लग्न न झालेल्या महिला, घटस्फोटित महिला, विधवा यांना टार्गेट करायचा असं पोलिसांनीही सांगितलं. वेबसाईटवर तो त्यांच्याशी संवाद साधायचा. मग हळूहळू त्यांचा फोन नंबर, पत्ता घेऊन त्यांचं घर गाठायचा. त्यानंतर भावनिकदृष्ट्या या महिलांना तो आपलंसं करायचा. लग्नानंतर मी तुझ्या मुलांनाही सांभाळेन असंही वचन काही महिलांना त्याने दिलं होतं. तर काही महिलांना मी तुला सरकारी नोकरी लावून देईन असंही आश्वासन दिलं होतं.
मंदिरात लग्न करायचा आणि..
ज्या महिलेशी सूत जुळायचं तिच्याशी बिरांची नारायणनाथ हा मंदिरात लग्न करायचा. तसंच ज्या महिलेशी लग्न करायच्या त्याच महिलेच्या घरी राहायला जायचा. बिरांचीने एकाही महिलेला स्वतःच्या घरी नेलं नाही. काही दिवस चांगले जायचे, त्यानंतर तो ज्या महिलेशी लग्न केलं आहे तिला ब्लॅकमेल करायचा. तुझे खासगी फोटो मी वेबसाईटवर, सोशल मीडियावर पोस्ट करेन अशा धमक्या देऊन त्या बाईकडून पैसे उकळायचा आणि लग्नासाठी दुसऱी बाई शोधायचा. त्याच्या विरोधात ओदिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा सात राज्यांमध्ये याच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
बिरांची नारायणनाथला अटक
बिरांची नारायणनाथला ओदिशा राज्यातील गुन्हे शाखेने आणि सीआयडीने कटकमधून ( Crime News ) अटक केली आहे. या ठिकाणीही एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केली होती. या महिलेचा पती एका अपघातात मरण पावला. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत. बिरांची आणि या महिलेची भेट लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर झाली. त्यानंतर या दोघांचा परिचय झाला. या महिलेशी लग्न केल्यानंतर बिरांचीने तिच्याकडून पाच लाख रुपये आणि ३२ ग्रॅम सोनं उकळलं. या घटनेनंतर महिलेने जेव्हा नीट शोध घेतला तेव्हा या बिरांचीची अनेक लग्नं झाली आहेत हे समोर आलं. त्यानंतर या महिलेने बिरांची विरोधात तक्रार दाखल केली ज्यानंतर या बिरांचीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बिरांचीने सात राज्यांमध्ये १५ महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक केली. बिरांची विवाहीत आहे तरीही त्याने १५ महिलांशी लग्न करुन त्यांना गंडा घातला. या प्रकरणी त्याला अटक झाली असून विविध कलमांद्वारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.