चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे याचे गॉडफादर

0
9

दि . १६ ( पीसीबी ) – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवर्धम प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या संघटनेचा प्रमुख दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे याचे गॉडफादर आहेत. त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: तुझ्या पाठीशी आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.

याप्रकरणात दीपक काटे याच्यावर मकोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे होती. मात्र, अक्कलकोटमधील पोलीस तपासाधिकारी ढाकणे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा नातेवाईक आहे. दीपक काटे याला जामीन मिळवून देण्यासाठी योजना आखण्यात आली होती. एखाद्या गुन्हेगाराला बेलवर सोडायचं आणि त्याच्याकडून सामाजिक कार्यकर्त्याची हत्या घडवून आणायची, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे. त्यांनी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावर मारेकरी घातले होते. अगदी अलीकडे महात्मा गांधी यांची गोडसेसारख्या मारेकऱ्याकडून हत्या करण्यात आली. त्याचे आता उदात्तीकरण केले जाते. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा वारसा आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली.

प्रवीण गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेत दीपक काटे आणि भाजप नेत्यांचे व्हिडीओ दाखवले. त्यापैकी एका व्हीडिओत चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटेला उद्देशून म्हणत आहेत की, मागच्या सरकारने दीपक काटेला गुन्हेगार ठरवले होते. पण मला तुमचा गर्व आहे. तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी देऊ. घाबरु नका, तुमच्यामागे देवेंद्र भाऊ आणि मी आहे, असे बावनकुळे या व्हीडिओत म्हणत आहेत. दीपक काटे याच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगाराला भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस पद दिले जाते. गंभीर गुन्ह्यात दीपक काटेला जामीन मिळवून देणे, हे गंभीर स्वरुपाचे आहे. संघाच्या बैठकीत बहुजन संघटना संपवण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यानुसार दीपक काटेला एक टास्कर देण्यात आला आहे.

शस्त्रास्त्र कायद्याप्रमाणे दीपक काटे याला जामीन मिळू शकत नाही. मग दीपक काटे याला जामीन कोणी मिळवून दिला? दीपक काटे हा बावनकुळेंना स्वत:चा गॉडफादर म्हणवतो. तुम्हीही काहीही करा, तुमच्या पाठीशी मी आणि फडणवीस आहोत, असे बावनकुळेंकडून दीपक काटेला सांगितले जाते. संभाजी ब्रिगेडची फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा भाजपला त्यांच्या बहुमताच्यादृष्टीने धोकायदायक वाटते. त्यामुळे काटेला विशिष्ट कार्यक्रम देण्यात आला आहे. माझ्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात खोटी माहिती दिली, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला.