चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करणाऱ्यावर तडिपारी

0
354

सोलापूर, दि. ११ (पीसीबी) : सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करणाऱ्या भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर पोलिसांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या १५ ऑक्टोबर रोजी सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, अशाच प्रकारे पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाईफेक करण्याचा प्रकार झाला होता, मात्र त्याबाबत कारवाई झालेली नाही.

पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच सोलापुरात आले होते. यापूर्वी गेल्या सप्टेंबर महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर एका तरुणाने संताप व्यक्त करत तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यासाठी कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात नवीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता त्यांच्याभोवती स्वतः पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या समक्ष पोलिसांचा बंदोबस्त असताना भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष अजय ऊर्फ रावण संतोष मैंदर्गीकर (वय २६) यांनी पोलिसांचे कडे तोडून पालकमंत्र्यांच्या अंगावर शाईफेक करून काळा झेंडा दाखविला होता. शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी करीत मैंदर्गीकर यांनी हे कृत्य केले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. ते २६ दिवस अटकेत होते.