चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार ?

0
211

पिंपरी दि. २४ (पीसीबी) – मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी पलटवार केला आहे. कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही. आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत तेही पाहू. बघुयात, असं टोला सचिन अहिर  यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व यशस्वीपणे करत होते. त्यामुळे एक दिवस उद्धव ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असा दावाही अहिर यांनी केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले असते तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजपने फोडफोडीच षडयंत्र केलंय, असा दावा सचिन अहिर केला.
बारणेंनी तरी शिवसेनेत राहायला हवं होतं

खासदार बारणे यांना उद्धव ठाकरे यांनी मानसन्मान दिला. खासदारकी दिली. त्यांच्या खासदारकी बाबत आम्ही राष्ट्रवादीचा स्पष्ट विरोध केला होता. ती सीट आमची आहे, असं म्हटलं होतं,. रेकॉर्ड काढून बघा, मोदी लाटेत कोणालाही ही उमेदवारी दिली असती पण ती बारणे यांनाच दिली. उद्धव ठाकरे यांना सर्व सोडून जातायत अशा वेळी त्यांनी सोबत राहायला हवं होतं. दुर्दैव हेच आहे की त्यांनी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केलाय, आमदार, खासदार पक्षात आले नाहीत तरी सच्चा शिवसैनिक, कार्यकर्ता पक्षात पुन्हा परतत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
सभा, मेळावे सुरूच

शिवसेनेचे मेळावे सुरूच आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सचिन आहिर आदी नेते महाराष्ट्रभर फिरत असून शिवसैनिकांना आपली भूमिका सांगत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई, पालघर, भिवंडी, कर्जत, औरंगाबाद, नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. संजय राऊत यांनीही नाशिक आणि पुण्यात सभा घेतल्या. या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरे करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या बाहेरही जाहीर सभा घेणार आहेत. भाजपला मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचं दिसत आहे.