घोडेस्वारी साठी खेळाचे मैदान देण्याचा निर्णय, चौकशीचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

0
449

माजी खासदार शिवाजराव आढळराव पाटील यांच्या मागणीची घेतली दखल

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – चिखली येथील खेळाचे मैदान घोडेस्वारी साठी देण्याचा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांचा निर्णय ताबडतोब रद्द करण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची त्वरित दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रधान सचिव यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना दिले आहेत.

माजी खासदार आढळराव पीसीबी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, मी स्वतः या विषयावर नागरिकांशी बोललो. तीन दिवस उपोषण करणाऱ्या आमच्या भगिनी आणि नागरिक यांनी हे खेळाचे मैदान कायम असावे अशी मागणी केली. घोडेस्वारीसाठी ही जागा देणे सर्वथा चुकीचे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून मी स्वतः पूर्ण माहिती दिली. त्यांनी प्रधान सचिव यांना आदेश दिले. तात्काळ चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपण नागरिकांच्या मागणीवर ठाम आहोत आणि त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय होईल.

माजी महापौर जाधव यांची मागणी –
जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात नागरीकरण वाढले असून, स्थानिक नागरिकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आणि मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करावे, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबद्दल परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिंच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.

आयुक्तांना दिलेल्या निवदनामध्ये म्हटले आहे की, जाधववाडी- बोऱ्हाडेवाडी येथे ‘एसटीपी’ची जागा ही खेळाच्या मैदानासाठी योग्य आहे. तसेच, परिसरात गार्डनसाठी एकही आरक्षण नाही. त्यामुळे खेळाचे मैदान व गार्डन हे १/ १३० या आरक्षणामध्ये गट नंबर ९० मध्ये विकसित करण्यात यावे.