काळेवाडी , दि. २०(पीसीबी)- रिक्षामध्ये कुत्र्याची घाण दिसल्याने ती काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी एक वाजताच्या सुमारास पवना नगर, काळेवाडी येथे घडली.
सागर गुलचंद गाडे (वय 38, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सुरेश पंडित (वय 28, रा. पवनानगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या रिक्षात कुत्र्याची घाण दिसल्याने त्यांनी आरोपीला ती घाण काढण्यास सांगितली. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. शिवीगाळ करून रिक्षा जाळण्याची तसेच फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.