घर गहाण ठेऊन एक कोटी 85 लाखांची फसवणूक

0
365

वाकड, दि. २० (पीसीबी) – घराचे खरेदीखत करून त्याचा मोबदला न देता घर बँकेकडे गहाण ठेऊन तिघांनी वाकड येथील पिता पुत्राची एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

लखमशी कांजीभाई पटेल (वय 73, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 19) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य कालबाग (वय 60, रा. अंधेरी, मुंबई), दीपक शिवशरण प्रजापती (वय 46, रा. ओशिवरा मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या वाकड येथील घराचे खरेदीखत करण्याची परिस्थिती निर्माण केली. फिर्यादी यांच्या मुलाला खरेदीखत करून देण्यास आरोपींनी प्रवृत्त केले. खरेदीखत करून घेऊन मुलाला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता ते घर आरोपींनी आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवले. त्यावर दोन कोटींचे कर्ज घेऊन बेकायदेशीर बोजा निर्माण केला. यामध्ये फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची आरोपींनी एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.