जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर
राज्य निवडणूक आयोगाच्या आचासंहिता सर्वसाधारण सूचनांमध्ये स्पष्टता
दि.१४(पीसीबी)- निवडणूक कार्यक्रम अधिसूचित केल्यापासून म्हणजेच दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून संपूर्ण महापालिका क्षेत्रात जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक लढविणारे उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. मात्र, ध्वनीवर्धक (Mike) वापरास अथवा समूहाने फिरण्यास मनाई असेल. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आचासंहितेच्या सर्वसाधारण सूचनांमध्ये याबाबत सुस्पष्टता आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत. आचारसंहिता हि मार्गदर्शक तत्वे असून, निवडणूक प्रक्रिया जास्तीत जास्त आदर्श होण्यासाठी विविध आदेश/ निर्देश/ सूचना जारी करण्यात आले आहेत. माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजी आचारसंहितेसंदर्भात रानिआ/ जिपपंस – २०२५/प्र.क्र.४२/का-७ अन्वये सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ची आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या संदर्भाधीन परिपत्रकामध्ये सूचित केल्यानुसार निवडणूक कार्यक्रम अधिसूचित केल्यापासून म्हणजेच दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून संपूर्ण महापालिका क्षेत्रात सुरु आहे. आदर्श आचारसंहितेचा अंमल मतमोजणीची निकाल प्रक्रिया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दिनांक १६ जानेवारी २०२६ पर्यंत कायम राहणार आहे.
अधिनियमातील तरतुदी व त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे आदेश यानुसार जाहीर प्रचाराचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर, म्हणजे मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत आहे. त्यानंतर जाहीर प्रचार बंद होईल. जाहीर सभा, मिरवणूक, रॅली, रोड शो, मुलाखत व इलेक्ट्रॉनिक प्रिंट अथवा सोशल मीडियावरील भाष्य यांना बंदी आहे. तसेच, जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष/ उमेदवार यांना प्रचार पत्रक वाटप करण्यास बंदी आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर निवडणूक नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येईल. आदर्श आचारसंहितेच्या तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकारी आणि राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, उमेदवार आणि निवडणुकीशी संबंधित सर्व व्यक्तींची आहे.
जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक लढविणारे उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. मात्र, ध्वनीवर्धक (Mike) वापरास अथवा समूहाने फिरण्यास मनाई असेल. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आचासंहितेच्या सर्वसाधारण सूचनांमध्ये याबाबत सुस्पष्टता आहे.
अनधिकृत ओळखपत्र चिठ्ठी :
राजकीय पक्ष तथा उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्र तसेच त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक सापडणे सुलभ व्हावे यासाठी अनधिकृत ओळखपत्र चिठ्ठी देण्यास हरकत नाही. त्यावर मतदाराचे नाव, प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक, मतदाराचा अनुक्रमांक इत्यादी माहिती छापण्यास हरकत नाही. सदरची चिठ्ठी पांढऱ्या कागदावर असावी, मात्र त्यावर कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार अथवा त्याचे निवडणूक चिन्ह तसेच त्यावर कोणतीही घोषणा अथवा कोणत्या उमेदवारास मत देण्याबाबतचे आवाहन छापता कामा नये. उमेदवाराचे / पक्षाचे निवडणूक चिन्ह यांची छपाई केलेली ओळखचिठ्ठी मतदान केंद्रापासन १०० मीटर अंतराच्या आत कोणतीही व्यक्ती वाटताना आढळून आल्यास सदर व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असेदेखील माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.












































