घराघरात गुलाल उधळायचाय; आर. आर. आबांचा लेक रोहित पाटील पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात

0
62

कवठे महांकाळ, दि. 24 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात उतणाऱ्या उमेदवारांची चर्चा होतेय. असाच एक तरूण उमेदवार म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा लेक रोहित पाटील… रोहित पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तासगांव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीतील प्रचाराचं पहिलं भाषण रोहित पाटील यांनी गाजवलं. येत्या 23 नोव्हेंबरला प्रत्येक घराघरात गुलाल आणि भंडारा आपल्याला उधळायचाय, असं रोहित पाटील म्हणाले.

आर. आर. पाटील आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची कमी मला तुम्ही कधीही भासू दिली नाही, कार्यकर्त्यांना अशी भावनिक साद घालत रोहित पाटील यांनी भाषणाची सुरुवात केली. कार्यकर्त्यांची मान कधीही खाली जाऊ देणार नाही याची मी काळजी घेईन. अनेक निवडणुकात पक्षाने माझे स्टार प्रचाराकडून निवड केली होती. लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारासाठी मी सभा घेतल्या. पण स्वतः निवडणुकीला उभारल्यावर भाषण काय करायचं असतं. काय बोलायचं असतं याचं मला कल्पनाच नव्हती. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आतल्या दिवशी रात्री मी 25 वर्ष पूर्ण झालेत का? हे मी स्वतः पहिला मोजले. इथल्या लोकांनी आज पर्यंत मला ताकद दिलेली आहे. त्या सर्व लोकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं रोहित पाटील म्हणाले.

आर. आर. आबांपाठोपाठ आईकडून देखील मला खूप काही शिकायला मिळालं. आर. आर. आबांनी या भागात सिंचन योजना आणल्या. दुष्काळी भागात पाणी आणलं, पण दुर्दैवानं सावळज भाग राहिला होता. पण आम्ही टेंभू योजनेच्या माध्यमातून हे देखील पूर्ण केले. आज आपल्या समोर ज्या पक्षातून उमेदवार आहेत. त्याच भाजप पक्षाचे उमेदवार आम्हाला बागा काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. त्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराला आता तासगाव कवठेमहांकाळमधून काढून टाकायचे आहे, अशा शब्दात रोहित पाटील यांनी मंत्री सुरेश खाडे यांच्यावर निशाणा साधला आहे.