घराघरांतून चिखल, चिखल आणि चिखल…

0
91

कागदपत्रांचाही लगदा झाल्याने चिंतातूर, संसार भिजल्याने अनेकांची उपासमार सुरू


पुणे, दि. 26 जुलै (पीसीबी) – शहरात पुराचे पाणी शिरलेलेल्या सर्व वसाहतींमधून घराघरात चिखल चिखल आणि नुसता चिखल आहे. नागरिकांचे संसार भिजले. महत्वाती कागदपत्रे, विद्यार्थ्यांची पुस्तके, धान्य, मसाले, फ्रिज, टिव्ही, अंथरूण-पांघरून , फर्निचर सगळे सगळे भिजल्याने निकामी झाल्याचे चित्र आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोज बुडाला, उपासमार झाली मात्र अजूनही सरकारी यंत्रणा पंचणामे करायचे नाव घेत नसल्याने लोक त्रस्त आहेत. आपत्ती भयंकर आहे, मात्र त्या तुलनेत महापालिकेची यंत्रणा अत्यंत तोकडी असल्याने लोक संतापलेत.

तीन दिवसांपासून सलगपणे पिंपरी-चिंचवड आणि मावळ, मुळशी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील शासकीय खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी, नागरिकांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. कामावर, व्यवसायासाठी बाहेर पडणारे नागरिक यांना रस्त्यावर पाणी साचल्याने आणि जलमय रस्त्यातून वाट काढावी लागली. सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या आणि शेवटच्या शिफ्ट वरून येणाऱ्या कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली. त्यातच कामावरून परतताना अडकून पडलेले कर्मचारी, महिलावर्ग यांना वाहन मिळाल्याने घरी पोहोचण्यास उशीर झाला. पावसामुळे केवळ नागरिकच नव्हे तर पशुपक्षी आणि वाहनेही अडकून पडली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम, अग्निशमन यंत्रणा २४ तासांपासून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रस्त्यावर उतरून नागरिकांना सहकार्य केले. नदीकाठी असलेले रहिवासी, त्याचप्रमाणे पाणी शिकलेल्या काही सोसायटीमध्ये रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.

एसटी अडकली, न्यायालयाची इमारतीचा भाग पाण्याखाली
वल्लभनगर येथील भूमिगत पुलाखाली एसटी पाण्यात अडकून पडली होती. यामुळे एसटी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पाण्यातून बाहेर निघाल्याने अखेर त्या वाहनाला खेचून बाहेर काढण्यात आले. भूम आगाराचे ती एसटी होती. त्याचप्रमाणे नेहरूनगर येथील न्यायालयातील तळमजल्यावर पाणी साचले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका
शहरातील विविध मार्ग बंद केल्याने त्याचा मोठा फटका सर्वाधिक वाहतुकीला बसला. पीएमपीएमएल बसचे मार्ग बदलण्यात आल्या. तर काही बस थांबून ठेवण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडीमध्ये बसेस अडकल्याने वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. दुसरीकडे, राज्य महामंडळाची एसटी देखील कोकण मार्गे बंद करण्यात आली होती. सात मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मुळशी, घोडेगाव, महाड यामागे पुढे जाणारे फेऱ्या रद्द करण्यात आले. तर, इतर मार्गावर देखील वाहतूक कोंडीमुळे एसटीला उशीर झाला.

५५ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद
वीजयंत्रणेत पाणी शिरल्यामुळे निगडी येथील घरकूल व ओटा स्कीमचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सेक्टर चारमधील मातोश्रीनगर, रावेत येथील नदीकाठचा परिसर, सांगवी, हिंजवडी, दापोड, खराळवाडी आदी भागातील सुमारे ५५ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. मावळ व मुळशी तालुक्यातील वीजयंत्रणेला फटका बसला आहे. मुळशी तालुक्यात ३० ते ४० वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे १०५ रोहित्रांवरील १० ते १२ गावांचा व सुमारे २६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच मुळा नदीकाठच्या परिसरात भुकूम, भूगाव, माण व मारुंजी गावांतील २९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला.

आळंदी शहरात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने दोन रोहित्रांचा तसेच वडगाव शिंदे गावाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाईट येथे दोन वीजखांब पडल्याने दोन गावांचा तसेच कामशेत, लोणावळा, कार्ला, वडगाव, तळेगाव परिसरातील १८ ते १९ गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा धोका कमी झाल्यानंतर या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वाहतूक कोंडी अन् पोलिसांची धावपळ
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव पूल, काळा खडक रस्ता, भूमकर चौक, धनेश्वर पूल या ठिकाणी पाणी साचल्याने तर, पूल पाणी खाली येणे बंद करण्यात आल्या होता. यामुळे वाहनांची मोठी कोंडी झाली. चालकांना पर्याय रस्ता उपलब्ध न झाल्याने अनेकांनी वाहन तेथेच थांबवले. तर काहींना लांबचा वळसावरून पुढे जावे लागले. त्याचप्रमाणे मावळ, मुळशी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यावर देखील दरड पडल्याने तर कुठे पाणीच असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. यामुळे स्थानिक आणि वाहतूक पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. बघायची गर्दी आणि वाहनाची कोंडी त्या दोघांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.

वायसीएमची रुग्णवाहिका पाण्यात अडकली
मोरया गोसावी मंदिर परिसरात होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी गेलेली रुग्णवाहिका पावसाच्या पाण्यात मधोमध अडकली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका रस्त्यात अडकली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने रुग्णवाहिका मध्येच थांबवावी लागली. दरम्यान रुग्णवाहिकेत अडकलेले डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची टीम यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तूर्तास रक्तदान शिबिर हे रद्द करण्यात आले आहे.

हॉस्पिटलकडे जाताना कार पाण्यात अडकली, दोघांना वाचवले
आळंदी येथे हॉस्पिटलमध्ये जात असताना कार पाण्यात अडकली. कारमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिक नागरिकांनी वाचवले. ही घटना भोसले वस्ती, चऱ्होली येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी घडली. दोघे जण कारने आळंदी येथे हॉस्पिटलमध्ये जात होते. ते भोसले वस्ती, चऱ्होली येथे आले असता त्यांची कार पाण्यात अडकली. कार पाण्यातून वाहून जात असताना स्थानिक रहिवासी योगेश उर्फ भाऊ भोसले यांनी कारमधून दोघांना बाहेर काढले. कारमध्ये वृद्ध व्यक्ती आणि त्यांचा मुलगा होता. कार समोर मोठा खड्डा होता. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून वेळीच कारमधून दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.