घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक, पत्नीच्या मदतीने विकायचा चोरीचे दागिने

0
278

पुणे, दि. ५ (पीसीबी) : घरफोडी करून मिळालेल्या रोख रक्कम आणि दागिन्यांवर आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याची पत्नी आणि चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला पोलिसांनी सहआरोपी केले आहे. आरोपीकडून 13 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 38, रा. आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. सराफ व्यावसायिक गौरवकुमार शामसुंदर विजयवर्गीय (वय 36, रा. आंबेगाव, पुणे) आणि जयवंत याची पत्नी विद्या जयवंत गायकवाड (रा. आंबेगाव, पुणे) या दोघांना सह आरोपी करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीची घटना घडली. याबाबत गुन्हा केल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट दोन कडून केला जात होता. युनिट दोनने यातील आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केली.

आरोपी जयवंत याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 70 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो इतर काहीही कामधंदा करत नाही. घरफोडी चोरी करणे हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे. जयवंत हा पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी चोरी करताना एकही साथीदार सोबत घेत नसे. एकट्याने चोरी करून सतत राहण्याचे ठिकाण बदलून वेषांतर करून तो वावरत असे.

त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याच्या पत्नीच्या मदतीने सराफ व्यावसायिक गौरवकुमार याला चोरीचे दागिने विकल्याचे सांगितले. त्यामुळे त्या दोघांना देखील चोरीच्या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आले आहे. पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीकडून 13 लाख रुपये किमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.