महाळुंगे, दि.25 (पीसीबी)
घरगुती सिलेंडर मधून गॅसची चोरी करून घरगुती रिकाम्या सिलेंडर मध्ये त्याचे पुनर्भरण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) सायंकाळी सात वाजता भांबोली येथील अनुष्का गॅस रिपेरिंग सेंटर या दुकानात करण्यात आली.
दीपक संजय भूमकर (वय 23, भांबोली, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह दुकानाचा मालक प्रशांत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार राजकुमार हनमंते यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक भूमकर हा भांबोली येथील अनुष्का गॅस रिपेरिंग सेंटर मध्ये काम करतो. दुकानदार प्रशांत वाघ याच्या सांगण्यावरून दीपक याने घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून घरगुती रिकाम्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. हा गॅस चोरी करत असताना त्याने ज्वालाग्रही पदार्थांबाबत कोणतीही काळजी घेतली नाही. तसेच यामध्ये आरोपींनी ग्राहकांची व शासनाची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.












































