घरगुती सिलेंडर मधून करायचा गॅसची चोरी; पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या

0
104

दि ५ मे (पीसीबी ) – घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला जायचा. हे सिलेंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले जात असत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी दीड वाजताच्या सुमारास शितोळेनगर, सांगवी येथे करण्यात आली.

श्याम उर्फ लखन वामनराव लांडगे (वय 25, रा. शितोळेनगर, सांगवी. मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम लांडगे हा अंकित गॅस हे दुकान चालवत होता. त्याने त्याच्या दुकानात घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. हे लहान सिलेंडर तो चढ्या दराने विकत असे. याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर छापा मारून कारवाई करत श्याम याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 13 हजार 950 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.