घरखर्चाला पैसे न दिल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

0
794

दिघी, दि. २२ (पीसीबी) – पतीने घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजता भारतमाता नगर, दिघी येथे घडली.

रवींद्र बाबूलाल नागरे (वय ३९, रा. भारतमातानगर, दिघी. मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र यांच्या बहिणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवींद्र यांच्या पत्नीला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नागरे हे पेट्रोल पंपावर काम करत होते. तर त्यांची पत्नी गृहिणी होती. दोघेजण भारतमातानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. 17 डिसेंबर रोजी रवींद्र यांनी पत्नीला घरखर्चासाठी पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रवींद्र कामावर गेले. रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद होऊन भांडण झाले.

त्यानंतर पत्नीने रवींद्र यांना हाताने मारहाण करून चेहऱ्यावर नखाने ओरखडून जोरात सोफ्यावर ढकलून दिले. त्यावेळी रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला दुखापत झाली. त्याच वेळी पत्नीने रवींद्र यांचा शर्ट घेऊन तो रवींद्र यांच्या नाकावर दाबून धरत त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.