‘ग्रीन सोसायटी’ ही काळाची गरज

0
201

पुणे, दि. २९ (पीसीबी) – हा चालू युगाचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाग असणार आहे.सरकारच्या कामात नागरिकांचा सहभाग कृती रूपातून असायला हवा आणि तो चिरंतन राहायला हवा असेल तर आपल्या घरापासून करायला हवा,असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांनी केले.

पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघाच्या तसेच नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी),
सहकार विभाग (महाराष्ट्र शासन),पुणे आणि पिंपरी चिंचवड महा नगर पालिका,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि विविध सहयोगी संस्था आयोजित गुणवत्तापूर्ण शहर निर्माण
(क्वालिटी सिटी मिशन) या तीन दिवसीय चर्चासत्रातील ‘ हरित पुणे,पर्यावरण वार्ड,सोसायटी,दर्शनी शहर स्वच्छतेत लोकांचा सहभाग’ या विषयावर झालेल्या चर्चेत डॉ.नीलमताई गोऱ्हे बोलत होत्या.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील या चर्चेत सहभागी झाले होते.

आर्किटेक्ट पूर्वा केसकर,रोटे.केशव ताम्हणकर ,ग्रीन सोसायटी नियोजक,रोटे.विष्णू भेडा (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी) यांनी ही सादरीकरण करीत सहभाग नोंदवला.

डॉ.नीलमताई यांनी एन एस सी सी संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत चिकाटीने कार्य केले आहे.सामाजिक जाण वाढवित लोक सहभागातून टेकड्या वाचवल्या.या संस्थेचे संस्थापक थोर उद्योजक मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या पुढाकारातून अतिशय प्रेरक कार्याची धुरा शामलाताई देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोपासली आहे. काळाच्या बरोबर तंत्रज्ञान हे सर्व शहरांची मुख्य गरज आहे.चांगल्या वाय फाय सुविधा नसल्याने अनेक ठिकाणी औद्योगिक विकासात अडथळा निर्माण होतो हे देखील दुर्लक्षित करून चालणार नाही हे नमूद करताना लोक
सहभागीय चळवळीचे यश अधोरेखित केले.

ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुणवत्तापूर्ण शहर निर्माण या संकल्पनेचे स्वागत केले .ते म्हणाले,’ ग्रीन सोसायटी ‘ ही काळाची गरज आहे.पाणी बचत,दुषित पाण्यावर प्रक्रिया,सौर ऊर्जा वापर ,पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण,भूजल संवर्धन हे विषय आता जिव्हाळ्याच्या विषयातील प्रमुख आहेत.असे विषय जपणारी एखादी सोसायटी आवर्जून पहा आणि त्याचे कौतुक करा,असे सांगताना ते म्हणाले,’कोथरूड भागातील पाचशे हाउसिंग सोसायट्या मध्ये आम्ही सर्व्हे करीत आहोत,जेथे एकच छताखाली हे सगळे घडू शकेल.महिलांच्या आरोग्य सुरक्षा देखील महत्वाची आहे,हे नमूद करताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले,’ सॅनिटरी नॅपकीन ‘ उपलब्ध करून देणारे आणि वापरलेले नॅपकिन पर्यावरण पूरक पद्धतीने नष्ट करण्यासाठी आवश्यक मशीन हाउसिंग सोसायटी मध्ये असणे गरजेचे आहे.

गुणवत्ता पूर्ण शहर निर्माण कार्य करण्यासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या कार्याचे,चिकाटीचे चंद्रकांत दादा पाटील यांनी कौतुक केले.
पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम ( घन कचरा विभाग) महापालिकेसमोर असलेले घन कचरा विषयातील आव्हान कसे आहे आणि दैंनदिन कार्याची माहिती दिली.लोक सहभाग आणि कचरा विश्लेषण किती महत्वाचा आहे,याची माहिती सादरीकरणा द्वारे दिली.

शामलाताई देसाई यांनी एन एस सी सी चे संस्थापक डॉ.शंतनुराव किर्लोस्कर यांचे स्मरण करून त्यांची भूमिका आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एन एस सी सी करीत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली.महापालिकेच्या कारभारात मोहल्ला समितीचा सहभाग आला.आपले शहर स्वच्छ राहावे,ही मानसिकता तयार झाली.हे या संस्थेचे यश आहे.

आर्की.पूर्वा केसकर यांनी ग्रीन सोसायटी साठी करावयाचे उपक्रम विषद केले. रोटे.केशव ताम्हणकर यांनी ग्रीन सोसायटी ही संकल्पना यशस्वी करताना आलेल्या अनुभवाची माहिती दिली.ते म्हणाले,’असंख्य संस्थांना या बाबत तांत्रिक माहिती आणि अवेअरनेसची गरज आहे,हे ध्यानात आले,ते लक्षात घेऊन आम्ही गृह निर्माण महासंघा बरोबर उपक्रम राबविणार आहोत.रोटे.विष्णू भेडा (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी ) यांनी : माझे शहर माझे वचन ‘
या संकल्पनेवर आधारित उपक्रम सुरू केला आहे,त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरा घरात सोसायटी पर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ठ आहे,ज्यात पर्यावरण रक्षण हे मुख्य लक्ष्य आहे.

या सत्राचा समारोप सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केला.ते म्हणाले,’ आपण भौतिक सुविधा कडे जास्त लक्ष्य देत आहोत,माणसाचे मन निर्मळ करणारे ,ठेवणारे,सात्विक विचारातून एकजूट ठेवणारे वातावरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे.आपल्या राज्याला संत विचारांची पार्श्वभूमी आहे.त्यामुळे जबाब दरी आणि कर्तव्य यांची सांगड घालताना वैचारिक भूमिका तयार करणारे उपक्रम गृह निर्माण महासंघाने आयोजित करावेत,असे सुचविले. स्टॉल धारकांच्या वतीने झालेल्या सादरीकरणात आगी पासून सुरक्षा कशी असावी,यावर विवेचन केले.पर्यावरणीय कार्यकर्ते दिलीप मेहता यांनी सूत्र संचालन केले,महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी उपक्रमाची माहिती देत मान्यवरांचे स्वागत केले तर समन्वयक सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.