गौतम अदाणी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली का?, अमेरिकेत चौकशी सुरू

0
180

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – भारतात ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प मिळविण्यासाठी अदाणी समूह किंवा समूहातील लोक आणि समूहाचे संस्थापक गौतम अदाणी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली का? याबाबतची चौकशी करण्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने सदर चौकशीबाबतचे वृत्त दिले आहे. या चौकशीच्या फेऱ्यात भारतीय अक्षय ऊर्जा कंपनी ‘अझर पॉवर ग्लोबल’चाही (Azure Power Global) समावेश करण्यात आला आहे. ही चौकशी न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या ॲटर्नी ऑफिस आणि वॉशिंग्टनस्थित न्याय विभागाच्या फसवणूक पथकाकडून केली जात आहे.

अदाणी समूहाने काय प्रतिक्रिया दिली?
द इंडियन एक्सप्रेसने या बातमीनंतर अदाणी समूहाने दिलेली प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. “आमच्या अध्यक्षाविरोधात अशी काही चौकशी सुरु असल्याचे आम्हाला माहीत नाही”, असे उत्तर समूहाकडून देण्यात आले आहे. अदाणी समूहाने पुढे म्हटले की, एक व्यावसायिक समूह असलेल्या नात्याने आम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मानकांचे काटेकोर पालन करतो. आम्ही भारत आणि इतर देशातील भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा आदर करत असून त्या कायद्याचे तंतोतंत आचरण करत आहोत.

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने जानेवारी २०२३ मध्ये अदाणी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करून त्यांच्यावर समभागाच्या किमतीत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अदाणी समूहाच्या समभागात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यावेळीही अदाणी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले होते.