गौतमी पाटीलने केले प्राजक्ता माळीच्या भूमिकेचे समर्थन

0
17

पुणे, दि. २9 (पीसीबी)
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण चर्चेत आहे. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. तुम्ही फक्त महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही तर त्यांच्या कर्तृत्वावरही शिंतोडे उडवत आहात. कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का? असा प्रश्नही प्राजक्ता माळीने विचारला. प्राजक्ता माळीने घेतलेल्या भूमिकेचे कलाक्षेत्रातून कौतुक केले जात आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीचे समर्थन केले आहे.

गौतमी पाटीलने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमी पाटील ही प्राजक्ता माळीने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहे. प्राजक्ता तू जे काही बोललीस ते सर्व बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत, असेही गौतमी पाटीलने म्हटले आहे.

प्राजक्ता तू जे काही बोललीस ते सर्व बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत. मी देखील एक कलाकार आहे. त्यामुळे मलाही तुम्हाला विनंती करायची की एखाद्या कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या, त्याला कोणत्याही नेत्यासोबतच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचे नाव जोडू नका. तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा. तुम्ही कलाकाराच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही प्रेक्षक आमच्यावर प्रेम करता. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तू या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू अशीच पुढे जात राहा. हसत राहा आणि खूप छान राहा, असे गौतमी पाटील म्हणाली.

प्राजक्ता माळीने व्यक्त केली खंत
प्राजक्ता माळीने काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिने सुरेश धस यांच्या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला. “परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का हो, कार्यक्रमाला. त्यांची नावे का येत नाहीत. इव्हेंट मॅनेजमेंटचं सांगायचं तर पुरुष कलाकारांचं नाव घेतात. महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात. पुढे येतात. आणि तुम्ही असं बोलून त्यांचं नाव डागळता” अशी खंत प्राजक्ता माळी यांनी बोलून दाखवली.