गो-आधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन सुरु; डॉ. विजय भटकर यांची माहिती

0
274

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – ” आय.आय.टी. सह देशातील अनेक गावांमध्ये गायिंवर संशोधन सुरु आहे. देशाची अर्थव्यवस्था गायिंवर आधारित होईल का याबाबतचा आराखडा तयार होत आहे ”, अशी माहिती ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी आज (शनिवारी) भोसरी येथे दिली.

जनमित्र सेवा संघ,पुणे व सहयोगी संस्था यांच्या विद्यमाने पांजरपोळ येथे 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत कामधेनू महोत्सव अर्थात विश्व गो परिषद 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी दुपारी झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. विजयराव भटकर बोलत होते. यावेळी पं. वसंत गाडगीळ, पांजरपोळ ट्रस्टचे प्रमुख कांतीलाल संघवी, प. पू. यती अनिरुद्ध तीर्थ महाराज, नारायणपूर येथील श्री श्री श्री विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज, माता पावनेश्वरी (राजस्थान), ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ मदनगोपालजी वाष्णेय, जनमित्र सेवा संघाचे अध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर तुपे, केंद्र सरकारच्या बेटी बचाओ अभियानाचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, आमदार महेश लांडगे, मिलिंद एकबोटे, युवा गोरक्षक शिवशंकर स्वामी, विजय जगताप, काका काटे, माजी महापौर राहुल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला अमेरिका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून लोक आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यक्रमासाठी पाठविलेल्या संदेशाचे अनुजा कुलकर्णी यांनी वाचन केले. त्यामध्ये असे म्हटले होते, ” गोमाता हे भारतीय जनजीवनाचे आराध्य दैवत आहे. आईच्या नंतर गाईच्या दुधाला मान्यता आहे. गोमाता हि देशाची अधिष्ठात्री देवता आहे. गोवंश आधारित शेती हा अनुकरणीय उपक्रम आहे.”

डॉ. भाटकर म्हणाले, ” मी शाळेत असताना देशाची लोकसंख्या जवळपास 35 कोटी इतकी होती. सध्या 135 कोटी झाली आहे. नवीन पिढीला गायीचे महत्व समजले पाहिजे. गायिंवर देशात सुरु असलेले संशोधन गावागावात पोचले पाहिजे. त्यातून भारत कसा उभा राहील, हे महोत्सवाच्या माध्यमातून मंडळाचा प्रयत्न करू.”

संघवी म्हणाले, ” हि गोशाळा 1855 मध्ये तीन पारशी आणि दोन 2 हिंदू लोकांनी हि गोशाळा सुरु केली. लोकांचे गाईबद्दलचे प्रेम वाढावे यासाठी हि गोशाळा सुरु करण्यात आली. चाऱ्यासाठीच्या वनांवर सरकारने बांधकामे केली आहेत. त्यामुळे गोमातेची आता काही उरले नाही. त्यामुळे गायीबद्दल आस्था वाढली तरच गायी वाचतील.”

प. पू. यती अनिरुद्ध तीर्थ महाराज म्हणाले , ” पृथ्वी 7 स्तंभांवर आधारलेली आहे. त्यामध्ये गाय, ब्राम्हण, वेद, सतीमाता, सत्य वचन बोलणारा, निर्लोभी आणि दानी व्यक्ती यांचा समावेश आहे. यामध्ये पहिला स्तंभ गाय टिकला तर बाकीचे स्तंभ टिकतील. या सातपैकी गाय, ब्राम्हण, वेद, सतीमाता हे प्रमुख चार स्तंभ आहेत. आपल्या देशात गोवंशच होता. मात्र आपल्या बुद्धिमान लोकांमुळे नुकसान होईल म्हणून परदेशातील लोकांनी संकरित जर्सी गायी आपल्याकडे दिल्या.”

जनमित्र सेवा संघाचे कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.