गोव्याला फिरायला गेले अन मागे चोरट्यांनी घर फोडले

0
241

चिखली, दि. १७ (पीसीबी) – गोवा फिरायला गेलेल्या एका व्यक्तीच्या घरी चोरट्यांनी चोरी करून तीन लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राजे शिवाजीनगर चिखली येथे घडली.

रविंद्र सोपान भुजबळ (वय ३४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजबळ हे १२ जानेवारी रोजी सकाळी गोवा येथे फिरायला गेले. त्यानंतर अज्ञातांनी फिर्यादी यांच्या घराच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातून दोन लाख चार हजारांचे सोन्याचे दागिने, ८१ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ८० हजार रोख रक्कम, २५ हजारांचे घरगुती सामान आणि कागदपत्रे असा एकूण तीन लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. भुजबळ हे १६ जानेवारी रोजी मध्यरात्री घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.