गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार भाजपामध्ये

0
234

पणजी, दि. १४ (पीसीबी) – गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षातील दिगंबर कामतांसह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. गोव्यातील काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुश्किल असल्याने गोवा काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देण्यात आला असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली आहे.

येणाऱ्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान,एलविनो अरावजो,बर्नाद फर्नाडीसही उपस्थित होते.

राज्यातील जनतेने अकरा काँग्रेसचे आमदार निवडून दिले असतानाही पक्षातील आठ आमदार स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा खान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यानी यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.