बारणे यांच्या मध्यवर्ती प्रचार कचेरीचे गोविंदा यांच्या हस्ते उद्घाटन
गोविंदा यांच्या रोड-शोने बारणे यांचा प्रचार शिगेला
दि 6 मे (पीसीबी ) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन नामवंत अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात गोविंदा यांनी ‘रोड शो’ करीत मतदारांना बारणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील इमारतीत सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे, आमदार उमा खापरे, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस आदी प्रमुख पदाधिकारी व व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंदा यांनी संस्कृत मंत्र म्हणत खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या. ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला.
विजय रथावर आरूढ होऊन गोविंदा आणि खासदार बारणे यांनी जमलेल्या समुदायाला अभिवादन केले. दुचाकी घेऊन शेकडो युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावरून पिंपरी बाजारपेठेत गेली.
पिंपरी कॅम्प मधून फिरून रॅलीची पिंपरी गावात सांगता झाली. गोविंदा यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चहात्यांनी गर्दी केली होती. गोविंदा यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. श्रीरंग बारणे यांच्या धनुष्यबाण चिन्हापुढील बटन दाबून त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवावे व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे, असे आवाहन गोविंदा यांनी केले.
गोविंदा यांच्या ‘रोड शो’मुळे पिंपरी भागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत होते.