गोवा तो झाकी है…राजस्थान बाकी है…

0
275

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : गोवा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. गोव्यात कॉंग्रेसचे (Congress) ११ पैकी १० आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. अशात भाजप (BJP) श्रेष्ठींकडून या विलिनीकरणासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याची चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गोव्यातही १० आमदारांचा गट भाजपात विलीन होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीचा धडा घेत गोव्यातील काँग्रेस हायकमांडने आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोंडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.’फुटीच्या भीतीने काँग्रेसने आमदारांना अज्ञातस्थळी हलवले. मुकुल वासनिक गोव्यात दाखल झाले आहेत. घराणेशाही आणि देशद्रोही शक्तींचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन यामुळे देशभरात काँग्रेसचा डोलारा रोज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत आहे’, अशी टीका त्यांनी चित्रा वाघ यांनी केली. इतकेच नव्हे तर ‘गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।’, असा सूचक इशाराही त्यांनी ट्वीट मधून दिला.

आजपासून (११ जुलै) गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. तर दुसरीकडे गोव्याच्या राजकारणातही कॉंग्रेस आमदारांमध्ये हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस आमदारामंधील या हालचालींचा सुगावा लागल्याने काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने गोव्यात दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपाच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे पाच आमदार आजच्या अधिवेशनाला हजर राहिल्याने काँग्रेस त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे इतर आमदार भाजपात प्रवेश करण्याबाबत ठाम असल्याची चर्चा आहे.