गोवंश संवर्धनातून आर्थिक प्रगती साधण्याची संधी – रमेशभाई रूपारेलीया

0
305

‘विश्व गो परिषद 2022’ ची सांगता

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे गोवंश संवर्धनातून आर्थिक प्रगती साधण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक शेतकरी, गोवंश पालकांनी घेतला पाहिजे, असे आवाहन गोंडल येथील गीर गो जतन संस्थेचे रमेशभाई रूपारेलीया यांनी केले.

जनमित्र सेवा संघ पुणे यांच्या वतीने ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात ‘विश्व गो परिषद 2022′ आयोजन भोसरी पुणे येथे करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या परिषदेची रविवारी सांगता झाली. यावेळी रूपारेलीया बोलत होते. यावेळी जनमित्र सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुपे, कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी, केंद्र सरकारच्या’ बेटी बचाव अभियानाचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, गौरव कुदळे, काशिनाथ थिटे पाटील, गोरक्षक शिवशंकर स्वामी, अनिरुद्धतीर्थ महाराज, सद्गुरू नारायण महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर करण्यात आले. यामध्ये जगातील सतरा देशांमधील लाखो नागरिक सहभागी झाले होते.

रूपारेलीया म्हणाले की, कोणताही व्यवसाय अथवा सेवा देताना सचोटीने केली पाहिजे. अधिक लाभ मिळावा या उद्देशाने काम केले तर दर्जा घसरतो आणि लोकांची फसवणूक केली जाते. त्यापेक्षा उत्तम सेवा दिल्यास अधिक फायदा मिळतो.

समारोपाच्या भाषणात डॉ. राजेंद्र फडके म्हणाले की, देव आणि गोमाता यांच्या सेवेतून वाचनातून खूप ज्ञान मिळते. तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे; हा भाग गौण आहे. गोमातेची सेवा केल्याने आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते. तसेच गेल्या काही वर्षांपासून गोमातेच्या स्मगलिंग मधून टेरर फंडिंग केले जात असल्याचे समोर येत आहे. यावर केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी विनंती आपण सर्वांच्या वतीने करू. मोदी सरकार सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास याप्रमाणे कार्य करीत आहे. त्याचबरोबर आता ‘सबसे बडा धन गोमाता वन और बेटी’ यावर पुढील काळात काम करण्याची गरज आहे, असे डॉ. फडके यांनी सांगितले.

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी ‘पंचगव्य आणि त्याचे शास्त्रीय महत्व’ या विषयी मार्गदर्शन केले. कोरोनावर गुणकारी असलेल्या ‘पंचगव्य’ चिकित्सेला शासन मान्यता मिळणे आवश्यक आहे. तसेच पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रिये द्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो, असे ही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ.ज्योती मंडर्गी यांनीही मार्गदर्शन केले.

श्री.श्री.श्री.प.पू.१००८यति अनिरुद्धतीर्थ स्वामीजी यांनी सकाळी सुरभी यज्ञाची यजमानांच्या हस्ते पूर्णाहुतीने सांगता करण्यात आली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षात संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती फवारणी करणारे स्वयंचलित यंत्र, गो आधारित आणि नैसर्गिक शेतीवर आधारित उत्पादने उपलब्ध होती. प्रदर्शन कक्षाला नागरिकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

यावेळी गौरव कुदळे, काशिनाथ थिटे यांनी मनोगत व्यक्त केले. अखेरच्या सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. आभार डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी मानले. परिषदेसाठी देशभरातील अनेक तज्ज्ञ, गोरक्षक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

मान्यवरांचे विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शने झाली. त्यात डॉ. विद्याधर वैद्य यांनी ‘प्राचीन हवामान शास्त्र’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजीव देवकर यांनी यज्ञ, पाऊस, वादळ पंचक्रोशीतील अंदाज आणि गो संगोपन करताना गावातील प्रत्येक नागरिकाने कसे प्रयत्न करावे याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. मार्कन्डेय यांचे गो-रक्षा आणि गोशाळा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. डॉ. योगी यांनी गो शाळेचे वित्तीय प्रबंधन कसे असावेत या विषयावर संवाद साधला. डॉ.ज्योती मुंडर्गी यांनी देशी गायीच्या गोमूत्रामधील असणारे घटक याचे शास्त्रीय विश्लेषण सांगितले. डॉ. चव्हाण यांनी गो शाळा आणि गोआधारित शेती, तर जळगाव येथील डॉ बन्सीलाल जैन यांनी पंचगव्य चिकित्सा या विषयी उपस्थितांना माहिती दिली. संजय पांडे यांचे गो-रक्षा विषयी मार्गदर्शन झाले.