गोरगरिबांची दिवाळी होणार गोड! 1 लाख 22 हजार जणांना मिळणार शंभर रुपयांची किट

0
393

पिंपरी,दि.१९ (पीसीबी) – गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाकडून पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये धान्याचे किट देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून शिधा संचाची नोंदणी केली आहे. रेशन दुकानांमध्ये दोन दिवसांमध्ये हे किट उपलब्ध होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 22 हजार 476 रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोना महामारीनंतर अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा गोर-गरिबांची दिवाळी गोड ” व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने 100 रुपयांत शिधा किट देण्याचे जाहीर केले. या किटमध्ये एक किलो रवा, चणा डाळ, साखर व एक लिटर पामतेल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 22 हजार 476 रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात अन्नसुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. शहरात या योजनेचा लाभ घेणाऱ्या 1 लाख 22 हजार 476 रेशन कार्डधारक असलेल्या कुटुंबांमधील 4 लाख 65 हजार 795 जणांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. त्यानुसार पुरवठा विभागाने शिधा संचांची नोंदणी केली आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना 100 रुपयांत देण्यात येणाऱ्या या शिधा संचाच्या वितरणाचे कमिशन म्हणून रेशन दुकानदारांना प्रती संच सहा रुपये देण्यात येणार आहेत. वितरणाबाबत दुकानदारांना सूचना केल्या आहेत.

दिवाळी शिधा पॅकेज योजनेचे लाभार्थी – परिमंडळ रेशन कार्डधारक अ (चिंचवड)- 41 हजार 592, ज (पिंपरी)-37 हजार 37 आणि फ (भोसरी) 43 हजार 847 असे 1 लाख 22 हजार 476 लाभार्थी असणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांत किट मिळतील.दिवाळीपूर्वी या किटचे वितरण होणार आहे. वितरणाचे सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे परिमंडळ अधिकारी एन. पी. भोसले यांनी सांगितले.