किवळे, दि. ३० (पीसीबी) – सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गोवंश सदृश मांस कापून ते मुंबई येथे विक्रीसाठी निघालेल्या एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी किवळे येथे करण्यात आली.
खालिद सईद शेख (वय 27, रा. कुरेशीनगर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रईस शेख (वय 34, रा. घाटकोपर, मुंबई), वसीम (रा. फलटण, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कैलास उल्हारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराकडून मुंबईच्या दिशेने गोवंश सदृश्य मांस एका कारमध्ये घेऊन जात असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किवळे येथे सापळा लाऊन एक कार (एमएच 03/ झेड 6771) अडवली. त्यामध्ये एक लाख 20 हजार रुपये किमतीचे 600 ते 700 किलो गोवंश सदृश्य मांस आढळून आले. कार चालक खालीद याला पोलिसांनी अटक केली. हे मांस रईस शेख याच्या सांगण्यावरून वसीम याच्याकडून विकत घेऊन मुंबईला विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार अन्य दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.