दि. 31 (पीसीबी) – संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडने अखेर पुणे शहर पोलिसांकडे सरेंडर केलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे नावं राज्यभर चांगलेच गाजत होते. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचादेखील उल्लेख करण्यात येत आहे. याप्रकरणी विरोधक मुंडे यांची मंत्री पदावरुन हाकलपट्टी करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आज आपण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची इनसाईड स्टोरी समजून घेऊयात.
वाल्मिक कराड हा मुळचा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवाशी. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी तो परळीत आला. परळी त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला. दहावी झाल्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने परळी गाठली. वैद्यनाथ कॉलेजमध्ये असतानाचा प्रेमविवाह केला. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी वाल्मिक व्हीसीआर भाड्याने आणून नाथरा, इंजेगांव आदी गावांच्या जत्रेत ते तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे. नंतर मिळेल ती कामे करु लागला. याच दरम्यान गोपीनाथ मुंडे परमार कॉलनीत भाड्याने रहात होते. यावेळी त्यांचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकला त्यांच्याकडे घरगडीचे काम मिळवून दिले. घरात दूध, भाजीपाला, किराणा आणण्यापासून सगळी कामे वाल्मिक करु लागला. अल्पावधीतच त्याने गोपीनाथ मुंडे मन जिंकले.
आंदोलनात एक गोळी पायात लागली अन् मुंडेंचा खास माणूस बनला वाल्मिक. मिळालेल्या माहितीनुसार, १९९३ ते ९५ दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलचे सात सदस्य निवडून आले होते तर विरोधात असणाऱ्या प्रा. टी. पी. मुंडेंचे 23 सदस्य जिंकले होते. दरम्यान अध्यक्ष निवडण्यासाठी सभा सुरु झाली. सभेदरम्यान चांगलाच गोंधळ माजला. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी गोपीना मुंडेच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराडच्या पायात तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या पिस्तूलातून निघालेली गोळी लागली. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा त्याच्यावर विश्वास अधिक वाढला.
वाल्मिक अन् धनंजय मुंडें यांच्यातील घरोबा –
वाल्मिक कराड हा गोपिनाथ मुंडेंच्या घरी काम करत असला तरी त्यांचे भाऊ पंडित आण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते. दरम्यान, मुंडे परिवारामध्ये फुट पडली. याचवेळी वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्री वाढली. धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक साधत वाल्मिकने राजकारणात हातपाय पसरायला सुरुवात केली. यावेळी, बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा, जिल्हाधिकारी कोण असावा हे वाल्मिकच ठरवत असे सांगितले जाते. परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, परळी नगर परिषदेचा उपनराध्यक्ष आणि माजी गटनेता. तसेच, नाथं प्रतिष्ठानचा सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य, आणि गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिकच्या खांद्यावर होती. हे पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यावरुन स्पष्ट झाले.