गोडाऊन मधील गाडीचा फोटो काढल्याने कंपनीच्या वितरकाला मारहाण

0
267
crime

दि २६ मे (पीसीबी ) – गोडाऊनमधील गाडीचा फोटो काढल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच मोबाईल फोनमधील फोटो डिलिट करून फोन फोडले. जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना थेरगाव येथे आनंदवन हौसिंग साेसायटीमध्ये शुक्रवारी (दि. 24) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

आशिषकुमार अजयकुमार मिश्रा (वय 31, रा. साखरेवस्ती, हिंजवडी, मूळगाव पडरौना, कुशीनगर, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 25) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजेश चोपडा (वय 38, रा. थेरगाव) तसेच त्याच्यासोबतच्या पाच ते सहा अनोळखी संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिषकुमार हे एका खासगी कंपनीचे वितरक (डिस्ट्रिब्युटर) आहेत. तर रुपेश चोपडा हा त्याच कंपनीत पूर्वी वितरक होता. रुपेश हा त्याच कंपनीचा माल दुसऱ्या वितरकाकडून घेऊन फिर्यादी आशिषकुमार यांच्या परिसरामध्ये वितरीत करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादी आशिषकुमार आणि त्यांच्यासोबत विशाल राजेश यादव, सत्यप्रकाश यादव, चंदनकुमार सिन्हा व संजय कोडंबे हे रुपेश चोपडा याच्यावर नजर ठेवण्यासाठी गेले. रुपेश चोपडा याच्या गोडाऊनजवळ ते सर्वजण थांबले होते.

त्यावेळी गोडाऊनमधून बाहेर आलेल्या गाडीचा फिर्यादी आशिषरकुमार फोटो काढत होते. त्यांना फोटो काढताना पाहून राजेश चोपडे आणि त्याच्यासोबत पाच ते सहा जण तेथे आले. तुम्ही ईथे का आला आहात आणि माझ्या गाेडाऊनमधील गाडीचा फोटो का घेतला, असे रुपेश चोपडा म्हणाला. आशिषकुमार यांनी फोटो घेतल्याच्या कारणावरून रुपेश याने सर्वांना शिवीगाळ केली. तसेच विशाल यादव यांचा मोबाइल फोन हिसकावून घेत त्यामधील फोटो डिलीट केले. तसेच विशाल यांना कंबरेचा बेल्ह काढून मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या पाच ते सहा लोकांनी सर्वांना शिवीगाळ करून मारहाण केली. तुमच्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणत रुपेश चोपडा हा फिर्यादी आशिषकुमार यांना गोडाऊनमध्ये घेऊन गेला. ते गोडाऊनमध्ये जाताच त्याने गोडाऊनचे शटर खाली ओढून आशिषकुमार आणि सर्वांना शिवीगाळ केली. त्यानंतर आशिषकुमार यांचा फोन घेऊन त्यातील गाडीचे फोटो डिलीट केले. तसेच आशिषकुमार यांना रुपेश आणि त्याच्यासोबतच्या पाच ते सहा लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी रुपेश यास समजावून सांगत असताना त्याने चंदन सिन्हा आणि सत्यप्रकाश यादव यांचे मोबाइल फोन जमिनीवर आपटून फोडले. त्यानंरत तेथून सर्वांना हाकलून दिले. पुन्हा इकडे आलात तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकीही दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.